चाळीस दिवसांपासून पावसाची दडी; सोयाबीन, कापूस, तुरीचे मोठे नुकसान.
२ ऑक्टोबरला तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा; आमदारांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील सुमारे चाळीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके मोठ्या संकटात सापडली आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाअभावी सुमारे ५० टक्के पिके सुकून गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांवर पावसाअभावी मोठा परिणाम झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाची दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात पिकांची वाढ समाधानकारक होती; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आणि उभ्या पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली. अनेक ठिकाणी पिके अक्षरशः सुकून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा त्यामध्ये समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, अशी मागणी आहे.शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असताना खरीप पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बियाणे, खते, औषधे, मशागत तसेच इतर शेती खर्च करून उभे केलेले पीक पावसाअभावी हातातून जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक आमदारांनी तातडीने लक्ष घालून नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागणीची दखल घेण्यात आली नाही तर २ ऑक्टोबर रोजी वडुरा, ता. नांदगाव खंडेश्वर येथे तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचा योग्य आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या मागणीसाठी विठ्ठल बाबनराव शेटे, प्रशांत ढेरे, गोपाल घाटे, मोहन काजे, अतुल लोंढे, अशोकराव कणसे, मधुकर ढेरे, भीमरावजी चौकट, रमेश चव्हाण, गणेश भाऊ रिठे, मनोज लोंढे, राजू चौकट, विकास शेटे, राजू काजे, ओंकार राऊत, जितू बेंद्रे, देवेंद्र ढेरे, जगतरावजी लोंढे, श्याम पाटील ढेरे, पोलीस पाटील भूषण भाऊ शेटे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली आहे.
