सातारगाव आरोग्य केंद्रातील अनेक पदेही रिक्त
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांजरी म्हसला येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रभावित झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून येथील आरोग्य यंत्रणा ठप्प असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.मांजरी म्हसला येथे मुख्यालय असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिका सातारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना नियमित आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सातारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार परिचारिकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यासाठी मांजरी म्हसला येथे आवश्यक वैद्यकीय अधिकारी व परिचारिका तातडीने उपलब्ध करून देण्यासह सातारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.

३० सप्टेंबरपर्यंत दोन्ही ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून आरोग्यसेवा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
