नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याची मागणी.
छोटू मुंदे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. २१ रोजी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधले. विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटू मुंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील सुमारे ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अनेक शेतांमध्ये सोयाबीनची झाडे पूर्णपणे सुकून गेली आहेत. पिकाला शेंगा न लागणे, लागलेल्या शेंगा वाळून जाणे आणि झाडे सुकून खाली पडणे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.पावसाअभावी शेतातील ओलावा संपल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. एकीकडे वाढता खर्च आणि दुसरीकडे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून प्रशासनाने तालुक्यातील प्रत्यक्ष परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता केवळ पाहणी करण्यापुरती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.दरम्यान, नांदगाव खंडेश्वर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छोटू भाऊ मुंदे यांनी दिला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासन व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
