नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर गावात राम राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत गावातील शाळेतील इयत्ता ४ थी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार निबंधातून मांडले.यावेळी कार्यक्रमाला गावातील सामाजिक कार्यकर्ते, शाळेतील शिक्षकवृंद, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर उत्तीर्ण व गुणवंत लेखक ठरलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच बक्षीस वितरण करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कला व विचार करण्याची क्षमता वाढण्यास मदत होणार असून गावातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
