सरकारकडे तक्रार; ६ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा..
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अमरावती तालुक्यातील मासोद गावातील सर्व्हे क्रमांक २६२, २६३ क्षेत्रामधील ई- क्लास प्रकल्पासाठी आरक्षित जागा अन्य ठिकाणी हस्तांतरित करण्याच्या हालचालीविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत निवेदन सादर करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला
“गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेली ही आरक्षित जागा कोणालाही देऊ नये; अन्यथा ६ जून २०२६ पासून ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनी’ तीन दिवस तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
—गिरीश चौधरी, शेतकरी व समाजसेवक, मासोद
आरक्षित जागा बदलण्यामागील निर्णयावर प्रश्नचिन्ह
तहसीलदार अमरावती यांनी काढलेल्या पत्रानुसार काही जमीन ई-क्लास प्रकल्पासाठी दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. परंतु गावकऱ्यांचे म्हणणे असे की—
•ही जागा शैक्षणिक विकास, आरोग्य केंद्र, महिला उद्योगाभिमुख उपक्रम, ग्रामविकास कार्ये, महिला बचतगट, पाणीपुरवठा इत्यादींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
•भविष्यातील ग्रामविकासाची योजना या जागेवर अवलंबून आहे.
•जागेच्या हस्तांतरणामुळे गावाचा सर्वांगीण विकास ठप्प होण्याची शक्यता.ग्रामस्थांनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत ही जागा कुणाच्याही ताब्यात देऊ नये अशी जोरदार मागणी केली आहे.
गावकऱ्यांचा सरकारला इशारा
निवेदक शेतकरी गिरीश हरींश्चद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी निवेदन सादर केले असून त्यांनी सांगितले—“गावाच्या मुलभूत गरजा, भविष्यातील विकास, आरोग्य-सुविधा आणि सुरक्षेसाठी ही जागा अनमोल आहे. शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर ६ जून २०२६ पासून तीव्र आंदोलन उभारले जाईल.”यासाठी प्रशासनाकडे निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, खासदार व बळवंत वानखडे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,,पोलीस आयुक्त, अमरावती,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, अमरावती,गटविकास अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व सचिव यांना निवेदन देण्यात आले.मासोद गावातील आरक्षित ई-क्लास जागेच्या हस्तांतरणाचा मुद्दा आता गावकऱ्यांच्या अस्तित्वाशी जोडला गेला आहे. ग्रामस्थ एकवटले असून शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर तीन दिवसांचे तीव्र आंदोलन अपरिहार्य ठरणार आहे.
