कृषी पंपांसाठी स्वतंत्र फिडर व दिवसा १२ तास वीजपुरवठ्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी.
वारंवार वीजखंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी; वीज वितरण कंपनीकडे निवेदन.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मंगरूळ चव्हाळा व परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अमरावती ग्रामीण विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे. मंगरूळ चव्हाळा येथील विद्युत उपकेंद्रावर कृषी पंपांचा वाढता भार लक्षात घेता अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यासह कृषी पंपांसाठी स्वतंत्र फिडर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंगरूळ चव्हाळा व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी याच उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. कृषी पंपांची संख्या आणि वीजभार वाढल्यामुळे उपकेंद्रावर ओव्हरलोडची समस्या निर्माण होत आहे. परिणामी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.उपकेंद्रावर सध्या उपलब्ध असलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरवर वाढलेल्या कृषी भाराचा परिणाम होत असल्याने उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच कृषी पंपांसाठी स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून शेतीचा वीजपुरवठा अधिक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाऊन कृषी पंप चालविणे अनेकदा धोकादायक व त्रासदायक ठरते. त्यामुळे कृषी पंपांसाठी दिवसा किमान बारा तास नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर परिसरातील सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे व्यत्यय, ओव्हरलोड आणि कमी दाबाची समस्या दूर करण्यासाठी वीज वितरण कंपनीने तातडीने आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात. अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर व स्वतंत्र कृषी फिडर उपलब्ध झाल्यास मंगरूळ चव्हाळा तसेच परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.मराविमचे अमरावती ग्रामीणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना बाळासाहेब राणे, बाळासाहेब भागवत, तालुका प्रमुख प्रमोद कोहळे,विनोद पिंपळकर,प्रकाश मारोटकर इत्यादी उपस्थित होते.
