अमरावती–नेर बससेवा सुरू करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; अधिकाऱ्यांना दिला १ सप्टेंबरपर्यंतचा इशारा
अतिवृष्टीच्या धोक्यातील तांडा वस्तीतील घरांचे पुनर्वसन करण्याचीही मागणी; महिलांचा मोठा सहभाग
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील खेड पिंपरी गावातील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ व महिलांच्या वतीने मंगळवारी विभागीय परिवहन कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे धडक मोर्चा काढण्यात आला. अमरावती–नेर बससेवा सुरू करणे आणि अतिवृष्टीच्या धोक्यात असलेल्या तांडा वस्तीतील काही घरांचे पुनर्वसन करणे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, शेतकरी व नागरिकांच्या दळणवळणाची मोठी अडचण लक्षात घेऊन खेड पिंपरीचे सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी काही महिन्यांपूर्वी विभागीय परिवहन कार्यालयाकडे अमरावती ते नेर बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. प्रस्तावित बसमार्गामध्ये धानोरा गुरव, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड, खेड पिंपरी, पिंपळगाव निपाणी, सालोड, मंगरूळ चव्हाळ, शिंगणापूर-वाटफळी या गावांचा समावेश करून नेरपर्यंत बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीसाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. परिवहन विभागाच्या निर्देशानुसार बस मार्गावरील झाडांच्या फांद्या व इतर अडथळेही गावातील युवकांनी श्रमदानातून दूर केले. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही बससेवा सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.याच पार्श्वभूमीवर सरपंच मंगेश कांबळे व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्षा अर्चना संदीप भाऊ कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व महिलांनी विभागीय परिवहन कार्यालयावर धडक दिली. यावेळी महामंडळाच्या बैठकीच्या सभागृहात अधिकाऱ्यांना जाब विचारत, ग्रामीण भागातील नागरिकांच्या रास्त मागणीला विलंब का होत आहे, असा सवाल करण्यात आला. मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.यावेळी DTO अधिकारी रॉयलवार यांनी मार्ग सुरू करण्याबाबत प्रक्रिया करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. तसेच १ सप्टेंबरपर्यंत अमरावती–नेर बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.दरम्यान, तांडा वस्तीतील काही घरांना अतिवृष्टीच्या काळात रोगराई तसेच जीवितहानीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, ही मागणीही मोर्चाद्वारे करण्यात आली. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून तातडीने पाहणी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.या धडक मोर्चाला सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ कणसे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी दौलतराव विटकरे, सुशीला शिरकरे, गंगाबाई विटकरे, वनिता देवकथे, सुरेश विटकरे, ज्ञानेश्वर विटकरे, गजानन देवकथे, प्रमोद राऊत, रामेश्वर विटकरे, हरीकेशव राऊत, संतोष चौधरी, गौरव चौधरी, विनोद जाधव यांच्यासह सरपंच मंगेश हंसराज कांबळे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.आता प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी उतरते आणि १ सप्टेंबरपासून अमरावती–नेर बससेवा खरोखर सुरू होते का, याकडे खेड पिंपरीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
