ग्राहक झाला स्मार्ट ; एटीएमवरील गर्दी कमी.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
डिजिटल व्यवहारांकडे नागरिकांचा कल वाढला असून, यामुळे एरवीही एटीएमवर दिसणारी गर्दी आता कमी होत चालली आहे. अगदी पाच रुपयांच्या कोथिंबिरीचे बिलही फोन-पेद्वारे दिले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या पाकिटात रोकड नसतानाही खात्यातील रक्कम आटत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजीपासून तर फळे, किराणा, दूध, कापड, पेट्रोल आदी लहान-मोठ्या व्यवहारांमध्ये डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम एटीएमच्या वापरावर झाल्यामुळे आता शहरासह ग्रामीणभागातही एटीएम ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जण कोट्यवधींचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करीत असल्याने रोकड नेण्याचा ताणही कमी झाला आहे.
आतापर्यंत कोट्यवधींचे डिजिटल व्यवहार
▶️ देशाच्या डिजिटल पेमेंट अर्थात यूपीआयने ७८२ कोटी व्यवहारांचा टप्पा पार करून एक नवा उच्चाक नोंदवला.
▶️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उच्चांकी व्यवहाराबाबत आनंद व्यक्त केला आहे.
▶️ नागरिकांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याबद्दल नागरिकांची प्रशंसा केली आहे.
▶️ याच पार्श्वभूमीवर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही आतापर्यंत हजारो कोटींचे डिजिटल व्यवहार झालेले आहेत.

खर्च करण्याची मानसिकता वाढली
रोकड देऊन व्यवहार करताना जाणीव असायची. आता डिजिटल व्यवहारांमुळे सहजच व्यवहार होत असल्याने कुठलेही नियोजन न करता खर्च करताना दिसत आहेत.
सहजरीत्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे ग्राहकांची क्रयशक्त्ती आपोआपच वाढत जाते. प्रत्यक्षात खिशातून रोकड देत नाहीत.त्यामुळे जास्तीचा आणि अनावश्यक खर्च करण्याची मानसिकता बळावत चालली. त्यामुळे सावधगिरी बाळगणे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.
– जयंत पुसदकर
माजी प्राचार्य, नांदगाव खंडेश्वर
पैसे काढण्याचे प्रमाण घटले एटीएम वाढली
एटीएम हे साधन मागील वर्षांमध्ये पैसे काढण्यासाठी महत्त्वाचे होते.भाजीपासून तर फळे, किराणा, दूध, कापड, पेट्रोल आदी लहान-मोठ्या व्यवहारांमध्ये आता डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम एटीएमच्या वापरावर झाल्यामुळे आता शहरासह ग्रामीण भागातही एटीएम ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.
अशोक अजमिरे, नागरिक,मोखड, ता. नांदगाव खंडेश्वर
