पथ्रोट / नितीन दुर्बुडे
अचलपूर, अंजनगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतांमधील संत्रा बागांमध्ये आंबिया बहाराला गळती लागली असून केळीच्या बागा वाढत्या पाऱ्यामुळे होरपळत आहे. पथ्रोट, परसापूर, शिंदी, वाघडोह, कासमपूर, पांढरी (खा.) शिवाराला या उष्णतेचा मोठा फटका बसला आहे.यंदा तापमानाने नवीन उच्चांक गाठला आहे. साधारणतः ४० किंवा ४२ अंश सेल्शियस उष्णतेत संत्रा आणि केळी बागांमधील झाडं तग धरतात. अर्थात, त्या बागांनां आठवड्यातून दोनदा सिंचनाची व्यवस्था करणे अनिवार्य असते. यावर्षी मार्च महिण्यातच दिवसागणिक उष्णतामान वाढत गेले. परिणामी, सिंचनाची सोय झाली तरी पारा यावर्षी 46. अंशावर गेल्यामुळे संत्रा बागातील झाडांना आलेला आंबीया बार गळताना दिसत आहे.केळीच्या बागांची अवस्था देखील फारशी वेगळी नाही. तापमान वाढीमुळे रात्रीच्या प्रहरी जंगली वन्यप्राण्यांचा संचार वाढला. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या सुमारास सिंचनासाठी धजावत नाही. या वाढत्या उष्णतामानात आंब्यांची झाडं मात्र फळांनी भरलेली दिसतात. पण, पूर्वीसारख्या आमराया आता शिल्लक नाहीत. या हवामानामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी, आवक घटल्यामुळे बाजारात तेजी असली तरी, त्याचा लाभ शेतकऱ्यांना नियोजित वेळी मिळणार नाही, एवढे नक्की !
