नागपूर येथील आयोजन; रसिक मंत्रमुग्ध!
नागपूर (जिल्हा प्रतिनिधी)
मानवतेचे महापुजारी, थोर स्वातंत्र्यसेनानी तथा समाज-सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या ग्रामजयंतीनिमित्त दूरदर्शन व आकाशवाणी लोक-कलावंत प्रमोद पोकळे यांच्या “भजन-संध्या” कार्यक्रमाचे नुकतेच (ता.२९ ला) आयोजन करण्यात आले होते. या भजन-संध्येला नागपूरकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी प्रस्तुत केलेल्या एकापेक्षा एक सरस भजनांनी उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या ग्रामजयंती महोत्सवानिमित्त दि.२४ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमांचे आयोजन श्रीगुरुदेव सेवाश्रम, सुभाष पथ नागपूर येथे करण्यात आले. या महोत्सवात बुधवारी २९ एप्रिलला सायंकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत बडनेरा येथील दूरदर्शन व आकाशवाणी गायक प्रमोद पोकळे व संच यांच्या सुमधुर आवाजातील “भजन-संध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोकळे यांनी “मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे” या राष्ट्रसंत रचित भजनाने कार्यक्रमाचा आरंभ करून लागोपाठ एकापेक्षा एक सरस भजने सादर करून “किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या” या आनंद भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.याप्रसंगी तबल्याच्या साथीला महेंद्र औरंगपुरे तर टाळ व सहगायनाच्या साथीला हभप गणेश खंडार, प्रज्वल वांगे व प्रज्वल हिरडे आदी सहकलावंत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड. अशोक यावले, नगरसेवक मनोज साबळे, सचिव विठ्ठलराव पुनसे, राजेश कुंभलकर, दिलीप सुरकार, सियाराम चावके, रामदास टेकाडे, रामराव चोपडे, आनंद माथने, सुरेंद्र बुराडे, बाबाराव शेंडे, सौ. संगीता जावळे, प्रभाताई ठवकर यांचेसह गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, कार्यकर्ता मंडळी व नागपूरकर आबालवृद्ध महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
