छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप;
तहसीलदारांमार्फत कडक कारवाईची मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित अवमानकारक विधान करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने एकत्रितपणे आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले विधान हे चुकीचे, तथ्यहीन आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवला,” असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. इतिहासात असा कोणताही दाखला नसताना जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणासमोर शरणागती पत्करली नव्हती. त्यांच्या कार्याचा आणि पराक्रमाचा अवमान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासावर घाला घालण्यासारखे आहे. यापूर्वीही १७ मार्च २०२३ रोजी याच व्यक्तीने संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद वक्तव्य करून वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या होत्या, असेही आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात संभ्रम आणि तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला.या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परिक्षित जगताप यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर पाटील (दहातोंडे), युवक काँग्रेस अध्यक्ष दिपक भगत, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे, माजी तालुका अध्यक्ष निशांत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर पंचायत नांदगाव खंडेश्वरचे बांधकाम सभापती मो. रियाज, माजी सरपंच सुशील थोरात, राहुल गुल्हाने, शेख हारुन, मो. ईद्रिसभाई, तनवीर, शिवाजी चव्हाण पटेल, मो. सलीम, रशीद कुरेशी, युनूस सर, गजानन चव्हाण, नरेंद्र थोरात, प्रदीप ब्राम्हवाडे, अमोल गुल्हाने, बाबू पवार, जितेंद्र चितोडिया यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता.प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित व्यक्तीकडून जाहीर माफी मागवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी ग्रामीण व शहरी भागातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
