सामान्य सभेत बहुमताने निवड, उपस्थित विश्वस्तांकडून अभिनंदनाचा वर्षाव,
चांदुर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात कापुराची यात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २७ एप्रिल २०२६, सोमवार रोजी दुपारी १२.०० वाजता संस्थानच्या सभागृहात सामान्य सभा संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम वैतागराव नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये दिवंगत विश्वस्त वामन केळबाजी रामटेके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विश्वस्त पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.यामध्ये वसंत चोखाजी शेंडे (रा. नागपूर) यांची बहुमताने नवनियुक्त विश्वस्त पदी निवड करण्यात आली.वसंत चोखाजी शेंडे हे संस्थानच्या विविध धार्मिक कार्यात सातत्याने सहकार्य करत असून धार्मिक सेवाभावातून महाराजांच्या सेवेशी बालपणापासून जोडलेले आहेत.संस्थानच्या गाथा समिती, यात्रा उत्सव समिती तसेच इतर सर्व धार्मिक उत्सवांमध्ये ते निस्वार्थपणे सहभागी होऊन अविरतपणे सेवा देत असत.त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत विश्वस्त मंडळाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत बहुमताने निवड केली.या प्रसंगी संस्थानचे जेष्ठ विश्वस्त विनायक पाटील यांचे हस्ते नवनियुक्त विश्वस्त यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या सामान्य सभेला संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच सर्व विश्वस्त विनायक पाटील, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर आणि स्वप्निल चौधरी यांची उपस्थिती होती.
