अंजनगाव बारी ( पवन इंगोले)
राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अपेक्षित पावसाला अद्याप जोर आलेला नाही. हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली असून विदर्भात उष्णतेचा प्रभाव वाढण्याचा इशारा दिला आहे.
अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांत पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उष्णतेची लाट (हीटवेव्ह) जाणवू शकते. अंजनगाव बारीसह ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
हवामान तज्ज्ञांच्या मते, अल निनो व इंडियन ओशन डायपोल (IOD) या हवामान घटकांचा मान्सूनवर परिणाम होत असून यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
