वाढत्या तापमानावर नियंत्रणासाठी नगर पंचायतने पुढाकार घ्यावा.
बांधकाम परवानगीपूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग व वृक्षलागवडीचे शपथपत्र घेण्याची मागणी.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून भूजल पातळी देखील खालावत चालली आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्याने ते जमिनीत मुरण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. यामुळे भविष्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली सक्तीची करण्यात यावी, आणि नवीन घर बांधकामाला परवानगी देण्या आधी त्यांना सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात यावे. अशी मागणी नगर पंचायत प्रशासनाकडे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनीकेली आहे. त्यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातील वाढते काँक्रीटीकरण, कमी होत असलेली वृक्षसंख्या आणि पावसाचे पाणी साठविण्याच्या सुविधांचा अभाव यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पावसाचे पाणी हे जमिनीत मुरविण्याची व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे शहरातील विविध प्रभागांमध्ये नगर पंचायत कडून मंजूर करण्यात येणाऱ्या नवीन बोअरवेलमधून तसेच जुन्या बोअरवेलमधून वाया जाणारे पाणी थेट जमिनीत मुरेल अशा प्रकारच्या उपाययोजना नगर पंचायतने कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन भविष्यातील पाणी संकटावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविता येऊ शकते.नगर पंचायतकडून नवीन घरे, दुकाने, व्यापारी संकुले तसेच शासकीय कार्यालयांना बांधकाम परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली उभारणे आणि परिसरात वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी संबंधितांकडून ₹१०० च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेण्याची अट घालण्यात यावी, असेही उत्तम ब्राम्हणवाडे यांनी निवेदनात नमूद करण्यात केले आहे.वाढत्या तापमानामुळे भविष्यात शहराची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाच्या दृष्टीने नगर पंचायत प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन ठोस उपाययोजना राबवाव्यात,अशी मागणी सुद्धा विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.
