वाढत्या यांत्रिकीकरणाचा परिणाम.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे सुरू केली. दरम्यान यंत्राद्वारे कामांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे मागील काही वर्षात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच आता रासायनिक खताचे दर गगनाला भिडले आहेत. पशुधन घटल्याने शेतीला पोषक ठरणारा शेणखत मिळणे कठीण झाल्याचे चित्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पहावयास मिळत आहे.तालुक्यातील पशुधन कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला. परिणामी उत्पादनात घट येत असल्याचे दिसून येत आहे. तर रासायनिक खताच्या अती वापरामुळे जमिनीची पोत खालावत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पशुधन असायचे. परंतु पशुधनावर होणारा खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न यात तोटा होत असल्याने तर काही शेतकऱ्यांनी आर्थिक संकटामुळे पशुधनाची केलेली विक्री यामुळे शेणखताचे प्रमाण मात्र कमी झालेले आहे. पूर्वीच्या काळी भरघोस मिळणारे शेणखत आता मात्र, दुरापास्त झालेले आहे. शेणखताच्या वापरामुळे शेतीची पोत सुधारून दर्जा वाढतो.भरघोस उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे. या खतामुळे रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात होत होता. त्यामुळे मानवी आरोग्यावर विशेष परिणाम दिसून येत नव्हता.परंतु तालुक्यात पशुधनाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना नाईलाज रासायनिक खताचा वापर करावा लागत आहे.

मानवी आरोग्य धोक्यात
मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. रासायनिक खताचा वाढलेला वापर, उत्पादन घेण्याची स्पर्धा कीटकनाशकांचा अतिवापर त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर न करता माती परीक्षण करून जमिनीला कोणते घटक आवश्यक आहेत. ती मात्रा देण्याची गरज आहे.
अशी सुधारेल शेतीची पोत
शेणखत पारंपरिक सेंद्रिय आहे. शेतकऱ्यांना ते शेतात उपलब्ध होऊ शकते. जनावरांच्या गोठ्यातील शेणामध्ये जनावराचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्याचे अवशेषही असतात. गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मूत्र सोपून घेता येते. ती माती जर शेणखताच्या खड्यात टाकली तर शेताची पोत सुधारते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४ टक्के नत्र. ०.१५ टक्के स्फुरद आणि ०.५० टक्के पालाश असते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून पिकाचे भरघोस उत्पादन वाढविण्यासाठी शेणखतासारख्या सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे.
