“न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन” छेडण्याचा इशारा.
विभागीय आयुक्त यांचेसह जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या विविध प्रश्नांकडे तहसीलदारांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समीर पाटील दहातोंडे यांनी अमरावतीचे विभागीय आयुक्त, यांचेसह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी हितासाठी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते.मात्र,निवेदन स्वीकारल्यानंतर त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप तालुका काँग्रेस कानेटीचे अध्यक्ष समीर पाटील दहातोंडे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दिवशीदेखील तहसीलदार हे आपल्या कार्यालयात जाणीवपूर्वक उपस्थित न राहता शासकीय विश्रामगृहात थांबले होते, असा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे.शेतकरी आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत तहसीलदारांकडून कधीही गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच तहसीलदार यांचेकडून कोणत्याही लोकप्रतिनिधींना सन्मानजनक वागणूक देत नसून, त्यांनी लोकप्रतिनिधींस बसण्याकरिता त्यांच्या कक्षातील सर्व खुर्च्या देखील उचलून ठेवल्या असल्याने सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्यासमोर उभे राहूनच निवेदन द्यावे लागते ही लोकशाहीची थट्टा असून तहसीलदार हे कार्यालयीन वेळेत मुख्यालयी उपस्थित राहत नसून दररोज अमरावती वरून अप डाऊन करतात आणि आपल्या कार्यालयात वेळेवर तर येत नाहीच आणि कधीं अमरावती निघून जातात त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्यथा या विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे

“शेतकरी, जनता आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यावा,” अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. तहसीलदारांविरोधातील तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विभागीय आयुक्त यांचेसह जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.तहसीलदारांवरील आरोपांची प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून शांततेच्या मार्गाने केलेल्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे आता विभागीय आयुक्त यांचेसह जिल्हाधिकारी या तक्रारीची कितपत दखल घेतात आणि तहसीलदारांच्या कार्यपद्धतीबाबत काय भूमिका घेतात, याकडे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
