पालकमंत्र्यांनी “मान्यवर कलाकार”च नेमण्याची मागणी
अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य राजकीय पक्षांतील कार्यकर्ते
तीव्र आंदोलन छेडण्याचा कलावंत संघटनांचा इशारा
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने”च्या जिल्हा निवड समितीत “शासन निर्णया”तील निकषांना बगल देत, पालकमंत्री महोदयांनी नियमानुसार ९ ज्येष्ठ मान्यवर कलावंतांऐवजी कलाक्षेत्रातील अनुभव नसलेल्या व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्याने जिल्ह्यातील शेकडो कलावंतांसह स्थानिक कलावंत संघटनांनी एकत्रित बैठक घेऊन तीव्र आक्षेप नोंदवला आहे.शासन निर्णयानुसार समितीत ९ ज्येष्ठ मान्यवर कलाकार व १ मान्यवर साहित्यिक असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद असताना, पालकमंत्री महोदयांनी निवड समितीवर नेमलेले अर्ध्याहून अधिक सदस्य राजकीय क्षेत्रातील व कलाक्षेत्राचा अनुभव नसलेले आहेत, असा आरोप कलावंतांनी केला आहे. त्यामुळे “अपात्र सदस्य योग्य कलाकारांची निवड कशी करणार?” असा प्रश्न उपस्थित करत, त्यांचा बायोडाटा व कलाक्षेत्रातील पात्रता तपासून, त्यांतील अपात्र सदस्यांच्या नियुक्त्या तातडीने रद्द करून केवळ मान्यवर कलाकारांचाच या निवड समितीत समावेश करावा; जेणेकरून पारदर्शक पद्धतीने योग्य कलाकारांची निवड होईल व खऱ्या कलाकाराला न्याय मिळेल. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्ह्यातील शेकडो कलावंतांच्या वतीने अ. भा. कलावंत न्याय हक्क समिती, कलावंत-साहित्यिक आधार, संघ व कलारसिक संस्था, अमरावतीचे पदाधिकारी यांनी दिला आहे.
