डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता; पशुपालकांना उपचारासाठी हेलपाटे.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने या विभागाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे.नियमित अधिकारी आणि आवश्यक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पशुसंवर्धन दवाखान्यातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या सहाय्यक उपायुक्त यांचेसह तालुका पशुसंवर्धन अधिकारी ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याशिवाय लोणी (टाकळी) येथील पशुसंवर्धन दवाखान्यात डॉक्टर व परिचराची पदे रिक्त आहेत. वाढोणा (रामनाथ) येथील दवाखान्यातही डॉक्टर व परिचर पद रिक्त आहेत.फुबगाव आणि निरसाना येथे सुद्धा परिचराची पदे रिक्त असल्याची माहिती आहेत.पशुधन हे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे.
जनावरांना अचानक आजार झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होणे अत्यंत आवश्यक असते.तरीसुध्दा संबंधित दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याने पशुपालकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.जनावरांना आजार बळावल्यासत्यांच्या जीवितासोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण, पशुधन तपासणी, विविध शासकीय योजना आणि पशुपालकांना मार्गदर्शनाची कामे केली जातात.मात्र या अत्यंत महत्वपूर्ण विभागातील रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त ताण पडत असून त्याचा परिणाम थेट ग्रामीण भागातील पशुपालकांवर होण्याची शक्यता आहे.एकीकडे शासन पशुपालनाला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे पशुसंवर्धन विभागातील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अनेक रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेणार का? पशुपालकांना वेळेवर पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार? असा सवाल आता पशुपालक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
