त्रिस्तरीय युवा प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
विविध महापुरुषांच्या जयंती तसेच मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने आयोजित त्रिस्तरीय युवा प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. रहाटगाव, नागपूर रोड येथील मराठा नगरीतील स्मृतीशेष सचिन चौधरी सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तीन टप्प्यांत हे प्रशिक्षण घेण्यात आले.

शिबिराच्या पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट रोजी स.सू. केशवराव भोसले तसेच क्रांतीसूर्य नानासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध वक्ते व लेखक प्रा. प्रेमकुमार बोके यांनी ‘मराठा सेवा संघ : काल, आज आणि उद्या’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी पंडित भोजराज चौधरी होते. यावेळी सुरेखाताई धर्माळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.दुसऱ्या टप्प्यात १६ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध प्रशिक्षक व वक्ते प्रा. दिनेश गाडगे यांनी ‘डिजिटल युगातील प्रभावी नेतृत्व : वक्तृत्व, संवादकला, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर’ या विषयावर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. बदलत्या डिजिटल युगात नेतृत्व, प्रभावी संवाद आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अश्विन चौधरी, अध्यक्ष, जिजाऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड होते.

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त २६ ऑगस्ट रोजी तिसरे व समारोपीय सत्र पार पडले. सुप्रसिद्ध प्रशिक्षक प्रा. दिलीप चौधरी (चंद्रपूर) यांनी ‘मराठा सेवा संघ : काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आडे होते. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष हर्षाताई ढोक यांचीही उपस्थिती होती.या त्रिस्तरीय प्रशिक्षण शिबिराला मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पूर्णवेळ उपस्थित होते. युवा पिढीमध्ये मराठा सेवा संघाची गरज, कार्य परिचय, भविष्यातील वाटचाल या सोबतच नेतृत्वगुण, प्रभावी संवाद, वक्तृत्व कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विधायक वापर यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हासचिव संजय ठाकरे, महानगर सचिव पंकज घाटे, महानगर कार्याध्यक्ष विजय गाडगे, जिल्हाकोषाध्यक्ष अरविंद पागृत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश बोंडे, परेश धर्माळे, वैभव ठाकरे, रवि मोहोड, दिपाली पागृत, मंजू ठाकरे, निशांत सरप यांच्यासह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड तसेच समकक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
