विद्युत वितरण कंपनीवर निष्क्रियतेचा आरोप.
दिवसाभरात अनेकदा होते बत्ती गुल.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठ्याची समस्या गंभीर बनली असून वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज गेल्यानंतर तासनतास पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सध्या उन्हाचा कडाका आणि वाढलेली उष्णता यामुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत. त्यातच वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे घरातील पंखे, कुलर, पाणीपुरवठा तसेच विविध विद्युत उपकरणे बंद पडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे. व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे.रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांना झोप न लागण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा देखील दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
येनस व रोहणा उपकेंद्राचे काम रखडले
तालुक्यातील येनस व रोहणा या गावांमध्ये ३३ के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक जागाही उपलब्ध झाली आहे. मात्र, उपकेंद्र उभारणीच्या कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. मंजुरी मिळून बराच कालावधी उलटूनही कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व शेतकरी करीत आहेत. उपकेंद्राचे काम लवकर सुरू झाल्यास आणि वेळेत पूर्ण झाल्यास तालुक्यातील वाढत्या वीज समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.नागरिकांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच मुख्य अभियंत्यांनी या संपूर्ण परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी प्रलंबित वीज प्रकल्पांची कामे पूर्ण करून तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
