18 जूनच्या आसपास हप्ता येण्याची शक्यता
30 जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 23 व्या हप्त्याची नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. जून महिन्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी केंद्र शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यांत एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. बियाणे, खते, औषधे तसेच पेरणीपूर्व शेतीच्या विविध खर्चासाठी हा निधी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.गतवर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर यंदाही 18 जूनच्या आसपास 23 वा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अधिकृत घोषणेअभावी शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करून शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, योजनेचा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी 30 जूनपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी, आधार लिंकिंग व बँक खात्याची माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अनोळखी लिंक, फोन कॉल किंवा संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसेच बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये,असे आवाहनही करण्यात आले आहे.
