शेतशिवार जलमय; सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाला पिके पाण्याखाली – दुबार पेरणीचे संकट, नागरिकांच्या घरातही पाणी
अंजनगाव बारी /पवन इंगोले
अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने अनेक शेतांतील बांध फुटले, सुपीक माती वाहून गेली आणि पिके चिखलात गाडली गेली. अनेक ठिकाणी शेतांमध्ये कंबरभर पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, बियाणे व खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी गावातही जनजीवन विस्कळीत झाले.

गावातील नाल्या तुडुंब भरून वाहिल्याने प्रभाग क्रमांक ३ मधील सिमेंट रस्त्यालगतच्या नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून नाल्यांची तातडीने साफसफाई व जलनिस्सारणाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, अंजनगाव बारी–पार्डी मार्गावरील तेलाई माता मंदिराजवळील नाला-बंधाऱ्यावरून महापुराचे पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी आले आणि काही भागांचा संपर्कही तात्पुरता विस्कळीत झाला.

“मोठ्या आशेने खरीप पेरणी केली होती; पण अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने संपूर्ण शेत पाण्याखाली गेले. पिके खरडून गेली असून आता दुबार पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.”
– रोशन ना. न्यायखोरे, शेतकरी, अंजनगाव बारी
