अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत आई-वडील हेच मुलांचे पहिले गुरु मानले जातात. त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची भावना विद्यार्थ्यांच्या मनात दृढ व्हावी या उद्देशाने श्रीराम प्राथमिक शाळा व फुलोर बालक मंदिर, लक्ष्मीनारायण नगर, अमरावती येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘मातृ-पितृ पूजन’ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गुरु वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे औक्षण करून, त्यांच्या चरणांचे पूजन केले तसेच पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतला. या प्रसंगी अनेक पालक भावूक झाले. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे, गीत, श्लोक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भारतीय संस्कृतीतील “मातृदेवो भव, पितृदेवो भव” या विचाराचे महत्त्व विशद केले. आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांचा सन्मान, त्यांचे मार्गदर्शन आणि संस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

शालेय जीवनात चांगले संस्कार रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक श्वेता कृष्णराव वाकोडे व रुपेश ज्ञानेश्वराव टाले, सुयोग गुणवंतराव निस्ताने,शितल गावंडे व निकीता जोशी,चित्रा राजुरकर.यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि कुटुंबमूल्ये जपणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले.शेवटी उपस्थित सर्व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या मातृ-पितृ पूजन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांप्रती आदर, प्रेम, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाला.
