अंबादेवीच्या पूजनानंतर वाजतगाजत ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये पूजा.
मंदिरांवर नवीन झेंडे चढवत ग्रामस्थांनी जपली धार्मिक परंपरा.
माहुली चोर/ विजय नाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त गावातील तसेच परिसरातील ग्रामदेवतांचे पारंपरिक पूजन मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून आजही जतन केली जात आहे.
गुरुपौर्णिमेच्या सकाळी ग्रामस्थ अंबादेवी मंदिरात एकत्र जमले. अंबादेवीचे विधिवत पूजन व आरती केल्यानंतर वाजंत्रीच्या गजरात गावातील व परिसरातील विविध ग्रामदेवतांच्या मंदिरांकडे प्रस्थान करण्यात आले. प्रत्येक मंदिरात विधिवत पूजन करून देवतांना नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच मंदिरांवर नवीन धार्मिक झेंडे चढवून ग्रामस्थांनी आपली श्रद्धा व्यक्त केली.गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग असलेल्या या उपक्रमात ज्येष्ठांसह युवकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.यावर्षीच्या पूजन सोहळ्यात मनोहर पवार, राजेश कोकाटे, रविंद्र भागवत, आदित्य चोरे, राजेश पवार, संदीप सरोदे, प्रफुल वाघ, रोशन चोरे, अक्षय पवार, मंगेश पवार, लक्ष्मण विर, अनिल नेवारे, अर्जुन राऊत, प्रभाकरराव कोळसेकर आणि सुधाकर कोळसेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.ग्रामदेवतांच्या पूजनामुळे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, ग्रामसंस्कृती आणि परंपरा जपणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक ठरला.
