सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी.
नागरिकांचा इशारा : प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
शिंगणापूर चौफुली परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या प्रवासी निवारा (बसथांबा) बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी वारंवार भीषण अपघात घडत असल्याने प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होणार असल्याचा आरोप करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर करून हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शिंगणापूर गावालगतचा चौफुली परिसर हा अनेक वर्षांपासून अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. यापूर्वी अनेक दुर्दैवी अपघात या ठिकाणी घडले असून, एका अपघातात ट्रक दुकानात घुसल्याची घटना घडली होती. तसेच एसटी बस, ट्रक व इतर वाहनांच्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी प्रवासी निवारा उभारणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नांदगाव खंडेश्वर, अमरावती व यवतमाळ मार्गावरील वाहतूक या चौफुलीवरून मोठ्या प्रमाणात होत असते. मोठी वाहने व एसटी बसना येथे तीव्र वळण घ्यावे लागते. अशा परिस्थितीत बसथांब्यावर प्रवासी उभे असल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.ग्रामस्थांनी पर्यायी सुरक्षित ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्याची मागणी केली असून, अमरावती-यवतमाळ मार्गावरील बस पूर्वी ज्या ठिकाणी थांबत होत्या, त्याच ठिकाणी पुन्हा बस थांबविण्याचे आदेश देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे करण्यात आली आहे.याप्रकरणी निवेदन देताना सूर्यपाल चव्हाण, प्रदीप देशमुख, अनिल कळंबे, धनंजय तोडसाम आणि रणजित देशमुख उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अमरावती, आमदार प्रताप अडसड, पोलीस अधीक्षक अमरावती आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अमरावती विभाग यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
