२०१८ मध्ये २५ कोटींचा निधी मंजूर, २०२६ मध्ये १ कोटींच्या कामाचे भूमिपूजन; तरीही मार्ग अर्धवट अवस्थेत
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंजनगाव बारी ते तीर्थक्षेत्र कोंडेश्वर या महत्त्वाच्या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिक, भाविक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हा मार्ग अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. तीर्थक्षेत्र कोंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीत या मार्गाच्या नूतनीकरण व डांबरीकरणाचा स्पष्ट उल्लेख असतानाही कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.कामातील विलंब लक्षात घेऊन आमदार रवि राणा यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या निधीतून मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी भूमिपूजनही करण्यात आले.

मात्र भूमिपूजनानंतर सुरू झालेले काम काही अंतरावरच थांबले असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप वाढत आहे.सदर मार्गावर सुमारे ५०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु पूर्ण झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्याचे दिसून येत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काम पूर्ण होताच रस्त्यावर तडे गेल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.संबंधित विभागाने या कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.तर उर्वरित मार्गावर खडी टाकून काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात हा मार्ग आणखी धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दि. २१ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या शिखर परिषदेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र विकास निधीतून २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून विविध विकासकामे सुरू झाली असली तरी अंजनगाव बारी-कोंडेश्वर मार्गाचे नूतनीकरण अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही.अधिक व पौष मांस, महाशिवरात्री, श्रावण महिना तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी हजारो भाविक या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, ग्रामस्थ आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
“अंजनगाव बारी-कोंडेश्वर मार्गाचे रखडलेले व निकृष्ट दर्जाचे काम नागरिक, शेतकरी आणि भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे.”
– विरेंद्र पुनिया
नागरिक तथा शेतकरी, अंजनगाव बारी
-
“अंजनगाव बारी-कोंडेश्वर मार्ग हा परिसरातील नागरिक, शेतकरी व भाविकांसाठी जीवनवाहिनी आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक असून प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे
-
– मिनल उ. डकरे,माजी पंचायत समिती सदस्या
