नवीन शासकीय इमारतींचा अभाव; अनेक कार्यालये अजूनही भाड्याच्या जागेत.
रस्ते, प्रशासन आणि मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत तीव्र नाराजी.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नांदगाव खंडेश्वर तालुक्याची प्रगतीऐवजी अधोगतीच होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा आणि कागदावरील योजनांपलीकडे प्रत्यक्षात तालुक्यात कोणतेही ठोस बदल दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून एकही मोठी नवीन शासकीय इमारत उभी राहिलेली नाही.अनेक शासकीय कार्यालये आजही भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू असून संबंधित विभागांना स्वतःच्या प्रशासकीय इमारती उपलब्ध नाहीत. काही कार्यालयांना तर आवश्यक शासकीय वाहने देखील उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.नांदगाव खंडेश्वर पोलिस स्टेशनची नवीन प्रशासकीय इमारत अद्याप उभी राहू शकलेली नाही. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचीही कमतरता आहे. तसेच पोलिस पाटलांच्या बैठकींसाठी स्वतंत्र सभागृह नसल्याने बैठका घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मंगरूळ चव्हाळा येथील पोलिस स्टेशनसाठीही नवीन इमारत आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबितच असून या विषयावर लोकप्रतिनिधींनी प्रभावीपणे आवाज उठविलेला नसल्याची खंत व्यक्त होत आहे. मिनी औद्योगिक वसाहतीची फक्त फलक लावण्यात आले असून अनेक वर्षांपासून येथे युवकांना हाताला रोजगार देण्याकरिता एमआयडीसी सुरू करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही.तालुक्यातील अनेक महत्त्वाचे विभाग अजूनही अपुऱ्या सुविधांमध्ये काम करीत आहेत. एकात्मिक बाल विकास योजना विभागाला कार्यालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने पडक्या इमारतीतून कामकाज करावे लागत आहे. पाणी परीक्षण विभागालाही स्वतंत्र कार्यालय उपलब्ध नसल्याने हे कार्यालय इतर तालुक्यात हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या गंभीर प्रश्नांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.अमरावती-यवतमाळ मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आणि सौंदर्यीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. चांदूर रेल्वे मार्गावर वाहन चालविणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत ठरत असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करीत आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा व सौंदर्यीकरणाचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. वारंवार मागणी होऊनही या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी पाठपुरावा झालेला दिसून येत नाही. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय, सामाजिक वनीकरण विभागाचे तालुका कार्यालय यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कार्यालयांची आवश्यकता असूनही या मागण्या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. सदर कार्यालय बडनेरा आणि अमरावती येथे सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्याच्या प्रशासकीय सोयीसाठी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाची अत्यंत आवश्यकता असताना हे कार्यालय नांदगाव खंडेश्वरऐवजी चांदूर रेल्वेला गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपानतरनणाचा विषय रखडला आले.तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा विषयही लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेतला नसल्याची भावना व्यक्त होत आहे.तालुक्यातील विकासकामांच्या नावाखाली केवळ लहान सहान रस्ते,अनुदानित कामे यांचे उद्घाटन करण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त असल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षात मूलभूत सुविधा, प्रशासकीय व्यवस्था, शासकीय कार्यालयांची उभारणी आणि पायाभूत विकास या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास न होता केवळ काही कार्यकर्त्यांचाच विकास झाल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे.विशेष म्हणजे या सर्व परिस्थितीविरोधात सामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून प्रभावी आवाज उठविला जात नसल्याने तालुक्याच्या विकासाचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. एकेकाळी मागास म्हणून ओळखला जाणारा नांदगाव खंडेश्वर तालुका गेल्या दहा वर्षांत आणखी विकासाच्या दृष्टीने मागास होत असल्याची भावना आता सर्वसामान्य नागरिक उघडपणे व्यक्त करीत आहेत.आता नागरिकांवर जे जे होते ते ते पहातची जावे,असे म्हणन्याची वेळ आली आहे.
