ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागत खर्चात मोठी वाढ
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
अंजनगाव बारी परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेती मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु डिझेल दरवाढ, सुटे भागांचे दर आणि मजुरीतील वाढ यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेती तयारीचा खर्च ग्रामीण भागात प्रचंड वाढलेला दिसत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटर आणि इतर मशागत कामांसाठी ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर धारकांनी प्रतितास भाड्यात वाढ केली असून, हा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला आहे.

ट्रॅक्टरचालकांची मागणी वाढल्याने भाडेदरही वाढले आहेत. नांगरणीसाठी प्रतितास ७०० ते ८०० रुपये, तर वखरणीसाठी ६०० ते ७०० रुपये आकारले जात असल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात. काही भागांत तर वेगळ्या पद्धतीने ८०० पेक्षाही अधिक रक्कम आकारली जात असल्याची चर्चा आहे.याशिवाय, सुटे भाग महाग, दुरुस्तीसाठी लागणारा खर्च आणि डिझेलमुळे वाढलेला ऑपरेटिंग कॉस्ट यामुळे ट्रॅक्टर मालकही भाडे वाढविण्यास भाग पडत आहेत. दुसरीकडे मजुरांच्या उपलब्धतेची कमतरता व मजुरीचा वाढलेला खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.
“दरवर्षी खरीपपूर्व मशागत काही प्रमाणात परवडायची. पण यंदा ट्रॅक्टरचे तासाचे भाडेच २०–२५% वाढले आहे. डिझेल महाग, मजुरी महाग, बियाणे-खतेही महाग… शेतकऱ्यांसमोर खरोखरच मोठे संकट उभे राहिले आहे.”
-नामदेव पाटील, शेतकरी, अंजनगावबारी
“आमच्यासारखे लहान शेतकरी पूर्णपणे ट्रॅक्टरवर अवलंबून आहोत. पण एका दिवसाचे मशागत कामही आता किमान ४ ते ५ हजारांवर जात आहे. उत्पादन किती मिळेल याची शाश्वती नाही, पण खर्च मात्र सतत वाढतोय.”
वासुदेव गवळी, शेतकरी – ग्रामीण परिसर अंजनगाव बारी
पेट्रोल–डिझेल दरवाढीवर सरकारवर ताशेरे -महागाईने त्रस्त नागरिकांचा संताप
सरकारच्या पेट्रोल–डिझेल दरवाढीचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असून, जनतेने सरकारवर तीव्र ताशेरे ओढले आहेत. सतत वाढणाऱ्या इंधनदरामुळे वाहतूक, शेती आणि घरगुती खर्चात मोठी भर पडली आहे.महागाईचे ओझे वाढत असताना सरकार दरकपात करण्याऐवजी जनतेच्या खिशावरच डल्ला मारत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. इंधनदर नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरवाढ तातडीने मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक आणि शेतकरीवर्गाकडून होत आहे.
