स्व.भास्करराव तिडके यांच्या इच्छेचा मान राखत तेरवीऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य
शिक्षण, गरजू नागरिक, धार्मिक व सामाजिक संस्थांना मदतीचा हात; संत विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक अमोल तिडके यांचे वडील स्व. भास्करराव भाऊरावजी तिडके यांचे दि. २ मे २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वेळ अधिक झाल्यामुळे देहदानाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तरीही त्यांच्या मानवतावादी व समाजसेवेच्या विचारांचा सन्मान राखत तिडके कुटुंबाने तेरवीचा पारंपरिक कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.तेरवीच्या कार्यक्रमावर होणारा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय तिडके कुटुंबाने घेतला आहे. त्यानुसार जि. प. शाळा खंडाळा खुर्द येथे शैक्षणिक मदत व पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच गावातील गरजू सुमनबाई सोनवणे यांना नगदी स्वरूपात मदत देण्यात येणार असून, गजानन महाराज संस्थान शेगाव येथे रुग्णांसाठी आवश्यक वस्तू स्वरूपात सहाय्य करण्यात येणार आहे. याशिवाय खंडाळा खुर्द येथील रेणुका माता मंदिरालाही वस्तू स्वरूपात मदत करण्याचे ठरविण्यात आले आहे.संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच गाडगे बाबा यांच्या समाजप्रबोधनपर विचारांपासून प्रेरणा घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे तिडके कुटुंबीयांनी सांगितले. अनावश्यक रूढी-परंपरांवर खर्च करण्याऐवजी समाजहितासाठी निधी वापरणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचा संदेश या कृतीतून देण्यात आला आहे.समाजात वाढत्या दिखावूपणाच्या पार्श्वभूमीवर तिडके कुटुंबाचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम म्हणून परिसरात त्याचे कौतुक होत आहे. यावेळी तिडके कुटुंबाने आपल्या नातलग, आप्तेष्ट व मित्रपरिवाराचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.“भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान” तसेच “जिंवत असता रोटी न दे, मेल्यावरी तेरवी श्राद्ध घालावे” अशा संत तुकाराम महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रचिती या कृतीतून आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील
“भुके नाही अन्न!
मेल्यावरी पिंडदान!!
हे तो चाळवाचाळवी!
केले आपणा चि जेवी!!”
तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील
“जिंवत असता रोटी न दे!
मेल्यावरी तेरवी श्राद्ध घालावे!!”
या ओळींचा प्रत्यय तिडके कुटुंबाच्या या निर्णयातून येत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
“माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार देहदान करण्याचा आमचा प्रयत्न होता. तो पूर्ण होऊ शकला नाही, याची खंत आहे. मात्र त्यांच्या सामाजिक व मानवतावादी विचारांचा वारसा जपत तेरवीसारख्या पारंपरिक खर्चाऐवजी समाजोपयोगी कार्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण, गरजू व्यक्ती, धार्मिक व सामाजिक संस्थांना सहाय्य करूनच त्यांना खरी श्रद्धांजली वाहता येईल, अशी आमची भावना आहे. समाजानेही अनावश्यक खर्च टाळून समाजहितासाठी पुढे यावे, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे.”
अमोल तिडके, खंडाळा खुर्द
