नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे ठिकाणीच निराकरण
तहसीलदार अश्विनी जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण; विविध योजनांबाबत मार्गदर्शन
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर अंतर्गत महसूल मंडळ दाभा येथे दिनांक ७ मार्च २०२६ रोजी स्थळ अस्तित्व लॉन येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अश्विनी जाधव होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डी. पेढेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी प्रदीप पिंजरकर यांनी केले. शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दाभा परिसरातील शेतकरी, नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपापल्या समस्या व निवेदन अर्ज सादर केले. शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करत होते.या शिबिरात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय आधार केंद्र, शिक्षण विभाग, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, सातबारा संगणकीकरण विभाग, निवडणूक विभाग, तालुका आरोग्य विभाग, विद्युत वितरण कंपनी, बालविकास प्रकल्प अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय, नोंदणी व मुद्रांक विभाग, पुरवठा विभाग तसेच सेतू सुविधा केंद्र आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्व विभागांनी आपल्या टेबलवरून नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करून शिबिर यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमादरम्यान तहसीलदार अश्विनी जाधव यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहनिबंधक व दुय्यम निबंधक, नांदगाव खंडेश्वर यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले.शेतीशी संबंधित सलोखा योजना, मुद्रांक शुल्क माफी, मुद्रांक शुल्क सवलत, वाटणीपत्र, तुकडेबंदी संदर्भातील शासन निर्णय यासारख्या विषयांवर उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच दस्त नोंदणीसंदर्भात विभागामार्फत उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवा सुविधांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी भूमी अभिलेख कार्यालय, नांदगाव खंडेश्वर येथील श्री. निशांत नागरगोजे यांनी महाभूमी पोर्टल, शेती मोजणी, घराचे फेरफार, शेतीचे पोटहिस्सा मोजणी आदी विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत ढोके, छाया सोनवणे, एस.पी. चराटे, संगीता वाघमारे, प्रीती बाजड, महसूल सेवक रोशन ठाकरे, दया वानखडे, विजय बैस, विजय पेढेकर, संदीप डोरलीकर, संगणक सेतू सुविधा केंद्राचे कर्मचारी तसेच पुरवठा विभागाच्या शीतल राठोड यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी ग्राम महसूल अधिकारी राजेश पिल्ले यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
