गोरगरीबांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
अंजनगाव बारी : प्रतिनिधी
येथील बारी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते, माजी वैद्यकीय अधिकारी तथा नामवंत डॉक्टर डॉ. रमेशजी माधवराव डकरे (वय ७८) यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. गांधी चौक, अंजनगाव बारी येथे त्यांचे वास्तव्य होते.
डॉ. डकरे यांनी जरूड-वरूड परिसरात वैद्यकीय सेवा बजावताना गोरगरीब व गरजू नागरिकांना सेवा दिली. मनमिळाऊ स्वभाव, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते सर्वपरिचित होते. विविध सामाजिक संस्था तसेच बँकांच्या संचालक मंडळात सहभागी होत त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. दि. २१ ऑगस्ट रोजी अंजनगाव बारी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह बारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय कार्याला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.डॉ. डकरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. ते बारी पंच उन्नत मंडळ, अंजनगाव बारीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ डकरे यांचे ज्येष्ठ बंधू होत.डॉ. डकरे यांच्या निधनाने बारी समाजाने एक अनुभवी मार्गदर्शक, सेवाभावी डॉक्टर आणि समाजहितैषी व्यक्तिमत्त्व गमावले असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
