महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश
धाराशिव / जिल्हा प्रतिनिधी
हिंदू भाविकांचे कुलदैवत असलेल्या **तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी संस्थानाच्या तब्बल ४ हजार १२१ एकरांहून अधिक इनामी जमिनीच्या कथित महाघोटाळ्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले होते. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.माहितीनुसार, तत्कालीन निजाम शासनाने श्री तुळजाभवानी देवी संस्थानाला १,६६६.१४ हेक्टर (सुमारे ४,१२१.१४ एकर) जमीन इनाम म्हणून दिली होती. कायद्यानुसार या जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही आणि या जमिनीवर कुळ कायदाही लागू होत नाही. मात्र, महसूल अधिकारी आणि इतर संबंधितांच्या संगनमताने या जमिनींचे अनधिकृत हस्तांतरण आणि विक्री झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, संस्थानाच्या नावे कागदोपत्री ३,३९७ एकर जमीन असताना प्रत्यक्ष ताबा चार मठांशी संबंधित खाजगी व्यक्तींकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच जगदंबा न्यासाच्या नावे असलेली ४०३ एकर जमीन मुख्य न्यासाला अंधारात ठेवून खाजगी व्यक्तींच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे.याशिवाय, ६३.०३ एकर जमीन संरक्षित कुळ दाखवून अनधिकृतरीत्या विकण्यात आल्याचा, तर एका अव्वल कारकुनाने अधिकारांचा गैरवापर करून २६१ एकर जमीन तब्बल ७३ खाजगी व्यक्तींच्या नावावर ७/१२ उताऱ्यावर नोंदवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अपसिंगा आणि उफळा गावांतील १५८ एकर जमिनीचेही फेरफार करून अनधिकृत हस्तांतरण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता भाविकांसह राज्याचे लक्ष लागले आहे.
