शेतकऱ्यांचा खरा कैवारी अद्यापही उपेक्षितच.
महाराष्ट्रात जन्माला येण्याची शिक्षा तर नाही ना जनतेचा प्रश्न ?
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे / पवन इंगोले
महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेले एक महान विचारवंत, समाजसुधारक,कृषितज्ञ आणि देशाच्या अन्न धोरणाचा पाया रचणारे पहिले कृषी मंत्री स्व.डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याबाबत केन्द्र, राज्य शासन आणि राजकीय व्यवस्थेची भूमिका अतिशय खेदजनक आणि लज्जास्पद ठरत आहे. स्व.भाऊसाहेबांचे विचार,कार्य,आणि त्याग केवळ निवडणुकीच्या काळात स्मरणात आणले जातात. निवडणूक आली की प्रत्येक राजकीय पक्ष ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ म्हणून त्यांचा उल्लेख करतो. पण निवडणुका संपल्या की त्यांचा इतिहास,विचार,आणि वारसा ढकलून दिला जातो.
डॉ.पंजाबराव देशमुख यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार मिळावा, यासाठी विविध स्तरावर मागण्या झाल्या.जिल्ह्यातील दोन खासदारांनी संसदेत याबाबत आवाज उठविला आहे.परंतु महाराष्ट्र सरकारने यासाठी कधीच प्रभावी शिफारस केंद्र सरकारकडे अद्यापही केली नसल्याचे समजते?त्यांच्या कार्याची दखल घेण्याऐवजी, केवळ घोषणांची जंत्री केली जात आहे.

तालुक्यात ना स्मारक, ना संग्रहालय – नांदगाव खंडेश्वरची उपेक्षाच
स्व.डॉ.भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झाला.त्या ठिकाणी त्यांच्या आठवणी जपण्यासाठी एकही शासकीय स्मारक, त्यांच्या वस्तूंचे संग्रहालय,किंवा उच्च शिक्षनाची सुविधा नाही. जिल्ह्यातील बहुजनांच्या गरीब मुलांना उच्च शिकण्याची सुविधा मिळावी म्हणून स्व.भाऊसाहेबांनी याच तालुक्यातून श्री.शिवाजी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली परंतु दुर्दैव पहा की तोच तालुका आज उच्च शिक्षणापासून वंचित आहे. त्याचप्रमाणे स्व.भाऊसाहेबांची पुस्तके,वस्तू,दुर्मिळ छायाचित्रे यांचा संग्रह आजही जनतेच्या दृष्टीआड आहे.याकरिता नांदगाव खंडेश्वर येथे त्यांच्या दुर्मिळ वस्तूचे संग्रहायल व्हावे ही मागणी शासनाने अद्यापही पूर्ण केली नाही.
पुण्यतिथी शासकीय स्तरावर होऊ नये यापेक्षा दुर्दैव काय असावे.
ज्या महापुरुषाने संपूर्ण देशात शेतकऱ्यासाठी कृषी क्रांती घडवून आणली आणि आपली संपूर्ण मालमत्ता विकून शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत केली त्या महापुरुषांची पुण्यतिथी ही १० एप्रिल रोजी असते ती सुद्धा या देशात शासकीय स्तरावर साजरी होऊ नये की याकरिता शासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन ती साजरी करू नये यापेक्षा दुर्दैव ते काय असावे.त्याचप्रमाणे या पुण्यतिथीचा उल्लेख पण थोर पुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजरी करण्यात येणाऱ्या शासकीय परिपत्रकात अद्यापही करण्यात आलेला नाही हे सुद्धा त्यांचे दुर्भग्यच म्हणावे लागेल.
डाक तिकीट आहे, पण सामान्यांसाठी उपलब्ध नाही !
स्व.डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या नावाने केंद्र सरकारने सन १९९९ यावर्षी एक डाक तिकीट जारी केलं होतं, परंतु ते तिकीट सामान्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध नाही.नागरिकांनी मागणी करून सुद्धा त्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेलं नाही ही गोष्ट त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यात शासनाच्या निष्क्रीयतेचा आणखी एक पुरावा ठरते.
जन्मदिवशी वृत्त्तपत्रामध्ये जाहिरातही नाही – निधी नसल्याचं कारण हास्यास्पद !
राज्यातील इतर थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने सर्व वर्तमानपत्रांमध्ये शासनाकडून शासकीय स्तरावर जाहिराती दिल्या जातात. मात्र, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मदिवशी शासनाकडून राज्यातील कोणत्याही वृत्त्तपत्रांना जाहिरात दिली जात नाही. त्यामागे “निधी उपलब्ध नाही” हे कारण माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने दिलं जातंय, जे अत्यंत असंवेदनशील आणि लज्जास्पद आहे.आणि या महत्वपूर्ण बाबीकडे शासनाचं लक्ष जाऊ नये ही बाब किती हाष्यास्पद म्हणावी लागेल.जर स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे इतर कोणत्याही राज्यात जन्मले असते, तर तिथल्या लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगून त्यांच्या नावाने देशात आणि राज्यात संशोधन संस्था,स्थापन करून त्यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार घोषित केले असते. पण दुर्दैवाने ते महाराष्ट्रात जन्मले आणि आपल्याकडे फारच ‘हुशार’ राजकीय लोक आहेत – जे केवळ उपयोग होईपर्यंत कोणत्याही महापुरुषाची आठवण काढतात.आणि नंतर त्यांना विस्मरणात टाकतात. त्यामुळे स्व.भाऊसाहेब देशमुख यांना महाराष्ट्रात नेहमीच एक प्रकारची सापत्य पणाची वागणूक मिळत आहे.स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी आपल संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेचलं,राज्यातील राजकीय नेते हे केवळ आपल्या स्वार्थासाठी आणि राजकीय प्रचारासाठी तुमच्या नावाचा उपयोग करीत आहेत. तुमचा खरा सन्मान होण्यासाठी ना सरकार गंभीर आहे, ना समाज. ही आमची घोर चूक आहे आणि ती कबूल करून आम्ही एवढंच म्हणू शकतो… “भाऊसाहेब, आम्हाला माफ करा!” आम्ही खरंच खूप करंटे आहोत तुमच्या नावाचा आम्ही राजकारणा पुरता उपयोग करून घेऊ शकतो परंतु तुमच्या साठी आम्ही काहीच करू शकत नाही कारण तेवढी आमची उंचीच नाहीं.”खरंच आम्हाला माफ करा.”
