अन्न व औषध प्रशासन विभागाचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याकडे दुर्लक्ष?
प्लास्टिक कप, वर्तमानपत्रात नाश्ता, अस्वच्छता, खराब तेलाचा वापर आणि पिण्याच्या पाण्यासाठी ग्राहकांची लूट
नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
राज्य शासनाने प्लास्टिक व फायबरच्या ‘यूज अँड थ्रो’ कपांमध्ये चहा देण्यास बंदी घातली असतानाही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक हॉटेल, चहाच्या टपऱ्या व नाश्त्याच्या दुकानांमध्ये या नियमाची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून सर्रास प्लास्टिकच्या कपांमध्ये चहा दिला जात असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.यासोबतच अनेक नाश्त्याच्या दुकानांमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र आहे. स्वयंपाकघर, भांडी, टेबल परिसर तसेच खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आढळून येत असून, अनेक ठिकाणी वारंवार वापरलेले निकृष्ट व आरोग्यास अपायकारक तेल वापरले जात असल्याच्या तक्रारी आहेत.अनेक ठिकाणी नाश्ता वर्तमानपत्राच्या कागदावर दिला जात असून, गरम अन्नाच्या संपर्कात छपाईतील रासायनिक शाई मिसळण्याचा धोका आहे.तसेच ग्राहकांना मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून न देता पॅकेज्ड (बिसलेरीसह इतर) पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्याही तक्रारी आहेत. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे नांदगाव खंडेश्वर तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नियमित तपासणी, नमुने तपासणे व नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यामुळे प्लास्टिक कपांचा वापर, वर्तमानपत्रावर अन्न देणे, अस्वच्छ हॉटेल, निकृष्ट तेलाचा वापर आणि ग्राहकांची आर्थिक लूट करणाऱ्या व्यावसायिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करून आवश्यकतेनुसार परवाने रद्द करावेत व विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
