कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते म्हणून देशभर ओळख;
विवेकानंद केंद्राच्या स्थापनेतून समर्पित युवक-युवती घडविण्याचा जीवनभर ध्यास!
पुण्यस्मरण विशेष
मा. एकनाथजी रानडे हे भारतीय समाजजीवनात राष्ट्रसेवा, संघटन कौशल्य, त्याग आणि समर्पण यांचा आदर्श निर्माण करणारे महान व्यक्तिमत्त्व होते. कन्याकुमारी येथील समुद्रातील भव्य विवेकानंद शिलास्मारकाचे निर्माते म्हणून ते संपूर्ण देशाला परिचित आहेत. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी अमरावती जिल्ह्यातील तिमटाला येथे त्यांचा जन्म झाला. सागर विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयात एम.ए. ही पदवी संपादन केली. बालपणापासूनच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी संपर्क आला. त्यातूनच त्यांच्या मनात निःस्वार्थ राष्ट्रसेवेचे संस्कार रुजले आणि त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित झाले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशभर कार्य केले. आपल्या संघटन कौशल्याच्या आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या बळावर त्यांनी संघात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुढे ते संघाचे सरकार्यवाहही झाले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजजागृती आणि देशसेवेसाठी वाहून घेतले.१९६३ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या राष्ट्रपुनरुत्थानाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी एकनाथजींनी ‘Rousing Call to Hindu Nation’ या पुस्तकाचे संकलन केले. याच काळात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारक उभारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. हे कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. समुद्रातील खडकावर भव्य स्मारक उभारणे, त्यासाठी देशभरातून सहकार्य मिळविणे आणि विविध अडचणींवर मात करणे, या सर्व बाबींसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अफाट इच्छाशक्ती, कल्पकता, चिकाटी आणि असामान्य संघटन कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी विवेकानंद शिलास्मारकाचे भव्य स्वप्न प्रत्यक्षात साकार केले.मात्र, केवळ दगडांचे स्मारक उभारून त्यांचे कार्य थांबणारे नव्हते. स्वामी विवेकानंद यांनी पाहिलेले बलशाली, वैभवशाली आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजात समर्पित कार्यकर्त्यांची फळी निर्माण होणे आवश्यक आहे, याची त्यांना जाणीव होती. त्याग आणि सेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाचे कार्य करणारे युवक-युवती घडविण्याचा त्यांनी संकल्प केला. याच विचारातून २२ ऑगस्ट १९७२ रोजी विवेकानंद केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून देशभरात व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार, शिक्षण, सामाजिक सेवा आणि राष्ट्रजागृतीचे कार्य सुरू झाले.२२ ऑगस्ट १९८२ रोजी त्यांच्या निर्वाणापर्यंत ते या महान कार्यात अखंडपणे कार्यरत राहिले. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे राष्ट्रभक्ती, ध्येयनिष्ठा, संघटनशक्ती आणि निःस्वार्थ सेवेचा आदर्श आहे. त्यांनी उभारलेले विवेकानंद शिलास्मारक आणि स्थापन केलेले विवेकानंद केंद्र आजही त्यांच्या दूरदृष्टीची आणि महान कार्याची साक्ष देत आहेत. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहील, हेच त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त माननीय एकनाथजी यांना अभिवादन!
– उत्तम ब्राम्हणवाडे,पत्रकार, नांदगाव खंडेश्वर
