नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चित्र.
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह!
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
हॉटेलमधील चविष्ट जेवण,महामार्गावरील ढाब्यांवरील खाद्यपदार्थ,फास्ट फूड सेंटरमधील चमचमीत पदार्थ आणि बेकरीतील आकर्षक मिठाई यांचा आस्वाद घेताना ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स,ढाबे,बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची संख्या वाढत असताना,तेथे मिळणाऱ्या अन्नपदार्थाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.
खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता राखणे,दर्जेदार कच्च्या मालाचा वापर करणे,अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठविणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणेने हॉटेल्स,ढाबे,बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची नियमित तपासणी करणे,परवाने व नोंदणीची पडताळणी करणे तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करणे महत्त्वाचे आहे.
खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची नियमित तपासणी हवी!
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगतचे हॉटेल्स, ग्रामीण भागातील ढाबे,फास्ट फूड सेंटर,बेकरी, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ तसेच जत्रा,यात्रा आणि सण-उत्सवांच्या काळात उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.
खाद्यपदार्थ निकृष्ट दर्जाचे असेल तर पोटाचे आजार व रोगराईला आमंत्रण देण्यासाठी खवय्ये स्वतः जबाबदार असतात. दूषित अन्नपदार्थ, अस्वच्छता, अयोग्य साहित्याचा वापर करून तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने आजार, पचनाचे विकार आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ पांडुरंग कावरे, वैद्यकीय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर
नियम कागदावर; प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय ?
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने विविध नियम निश्चित केले आहेत. स्वच्छ स्वयंपाकगृह, अन्नपदार्थांची योग्य साठवण, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, मुदतबाह्य पदार्थांची विक्री टाळणे,कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि अन्न हाताळताना आवश्यक खबरदारी घेणे, अशा बाबींचा त्यात समावेश आहे; मात्र या नियमांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते, याची नियमित पडताळणी होणे आवश्यक आहे.
