धामणगाव रेल्वेत भाजपला मोठा धक्का ज्येष्ठ नेते रामदास निस्ताने यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास निस्ताने यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपचे स्थानिक आमदार प्रताप अडसड यांच्या मतदारसंघात पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

शेकडो कार्यकर्त्यांसह ‘हात’ मजबूत
रामदास निस्ताने यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी केवळ ते एकटेच नव्हे, तर धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक संचालक, विविध गावांतील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांनीही काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेतला. या मोठ्या शक्तीप्रदर्शनामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील काँग्रेसची ताकद कमालीची वाढली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये पक्षाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा; निस्ताने यांचा थेट आरोप
पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास निस्ताने यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “भाजपमध्ये गेल्या काही काळापासून जुन्या, ज्येष्ठ आणि पक्षासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य मानसन्मान मिळत नाही. पक्षात निष्ठावंतांची विचारपूस पूर्णपणे थांबली आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. याच उपेक्षेला कंटाळून आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी लोकहिताची कामे करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार
रामदास निस्ताने यांनी यापूर्वी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्षपद, जिल्हा परिषद बांधकाम सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांची ग्रामीण भागात आणि शेतकरी वर्गात मोठी पकड मानली जाते. त्यामुळे त्यांच्या रूपाने ‘रामदास‘ नावाचे हे वादळ मतदारसंघाच्या राजकारणात नवी समीकरणे तयार करणार असून, आगामी काळात येथील राजकीय चित्र पूर्णपणे बदलणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात जाहीर स्वागत करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
