छताला गळती,नादुरुस्त विद्युत व्यवस्था,केरकचऱ्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर
नवीन ४८ निवासस्थानांना मंजुरी; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामास अद्याप सुरुवात नाही.
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील पोलिस विभागाच्या शासकीय निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून,जागोजागी छताला पाण्याची गळती,नादुरुस्त विद्युत व्यवस्था,परिसरात साचलेला केरकचरा आणि साफसफाईच्या अभावामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार होत आहे. त्यामुळे या निवासस्थानांमध्ये राहणे हे अंत्यंत धोकादायक बनले असून,बहुतांश कर्मचारी खासगी भाड्याच्या घरात राहण्यास मजबूर झाले आहेत. या पोलीस ठाण्याच्या परिसरात एकूण ४८ शासकीय निवासस्थाने आहेत.मात्र सर्वच इमारती जीर्ण झाल्याने त्या राहण्यायोग्य राहिलेल्या नाहीत.

त्या इमारती कधीही कोसळू शकतात इतक्या त्या जीर्ण झालेल्या आहेत.त्यांचे अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर कोसळत असून पावसाळ्यात घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळते.विद्युत फिटिंगही पूर्णपणे नादुरुस्त झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.दीर्घकाळापासून या निवासस्थानांमध्ये कोणीही राहत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गवत,झुडपे आणि कचरा साचला आहे.त्यामुळे साप,विंचू आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. याठिकाणी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत येथे राहावे तरी कसे,असा प्रश्न पोलिस कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

या गंभीर समस्येबाबत पोलिस विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून साफसफाई, दुरुस्ती तसेच नवीन बांधकामाबाबत पाठपुरावा करण्यात आला.मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान जुन्या व धोकादायक झालेल्या निवासस्थानांच्या जागी नवीन ४८ शासकीय निवासस्थाने उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे समजत असले,तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही.परिणामी कर्मचारी आजही असुरक्षित व जीर्ण इमारतींच्या समस्येला तोंड देत आहेत.सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की,एका बाजूला छप्पर कोसळण्याची भीती तर दुसऱ्या बाजूला सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका अशा दुहेरी संकटात येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन सुरू आहे.

त्यामुळे या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन मंजूर झालेल्या ४८ नवीन निवासस्थानांचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात यावे, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांमधून होत आहे.नुकतेच रुजू झालेले जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी या गंभीर प्रश्नात जातीने लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधत मंजूर निवासस्थानांचे बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पोलिस कर्मचारी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवून या प्रश्नाचा तातडीने निपटारा करावा अशी मागणीही जोर धरत आहे.
