जिल्ह्यात सर्वाधिक ८०० रुपये किलो दराने मटण विक्री; दर नियंत्रणाची मागणी.
अन्न व औषध प्रशासनाने आणि नगर पंचायतने कारवाई करावी.
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यात मटणाचे सर्वाधिक दर नांदगाव खंडेश्वर शहरात आकारले जात असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगली आहे.शहरातील अनेक मटण विक्रेत्यांकडे मटण तब्बल ८०० रुपये प्रति किलो दराने विकले जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर अनेक तालुक्यांमध्ये मटणाचे दर ५०० ते ६०० रुपये प्रति किलो असल्याने नांदगाव खंडेश्वरमध्ये एवढी दरवाढ कोणत्या निकषावर केली जाते,असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणितआधीच बिघडलेले असताना मटणाच्या वाढीव दरामुळे ग्राहकांना अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.मटण विक्रेत्यांकडून दरपत्रक प्रदर्शित केले जाते का ? दर निश्चित करण्यासाठी कोणती अधिकृत यंत्रणा आहे का? तसेच ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत आहे का?याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.याहून गंभीर बाब म्हणजे अनेक मटण मार्केटमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दुकानांच्या परिसरात साचलेले सांडपाणी,दुर्गंधी,मांसाच्याउघड्यावर होणारी हाताळणी,तसेच स्वच्छतेच्या मूलभूत नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनासह,नगर पंचायत प्रशासन आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवावी आणि मटणाच्या दरांची पडताळणी करावी तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकाकडून केली जात आहे. मटणाच्या वाढीव दरामागील नेमके कारण,पुरवठा,वाहतूक खर्च किंवा इतर कोणते घटक जबाबदार आहेत, याबाबत संबंधित प्रशासनाने वस्तुस्थिती नागरिकांसमोर स्पष्ट करावी,अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
