नगर पंचायतचे पाणीपुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांची महावितरणकडे मागणी.
नगरपंचायतीने घेतला मासिक सभेत ठराव.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरातील वाढत्या वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतचे पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी महावितरण कंपनीकडे मागणी केली आहे की, नांदगाव खंडेश्वर शहरासाठी स्वतंत्र टाऊन फीडर मंजूर करण्यासह शहरातील प्रत्येक डीपीवर एबी (Air Break) स्विच बसविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात नगर पंचायतचे पाणीपुरवठा सभापती वासुदेव अवधूत लोखंडे यांनी नगर पंचायतीच्या मासिक सभेत ठराव सुद्धा मंजूर करवून घेतला असून याबाबत त्यांनी अमरावती येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता,श्री. प्रदीप अंधारे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

पत्रानुसार,नांदगाव खंडेश्वर शहरासाठी स्वतंत्र टाऊन फीडर मंजूर करण्याचा ठराव नगर पंचायतच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या,वाढलेला वीज वापर आणि वारंवार होणारे वीज खंडित होण्याचे प्रकार लक्षात घेता स्वतंत्र टाऊन फीडरची गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचे नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापति वासुदेव लोखंडे यांनी नमूद केले आहे.यासोबतच शहरातील प्रत्येक वितरण रोहित्र (डीपी) वर एबी स्विच बसविण्याचा प्रस्तावही महावितरणकडे प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

एबी स्विच बसविल्यास देखभाल व दुरुस्तीच्या वेळी संपूर्ण शहराचा वीजपुरवठा बंद करण्याची गरज भासणार नाही. संबंधित परिसरातील वीजपुरवठा नियंत्रित करून इतर भागातील नागरिकांना अखंडित वीज मिळण्यास मदत होईल,असा विश्वास लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. दिलेल्या निवेदनासोबत नगर पंचायतच्या मासिक सभेतील ठरावाची प्रतही जोडण्यात आली आहे.शहरात सध्या वारंवार होणाऱ्या लोडशेडिंग व वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे स्वतंत्र टाऊन फीडर आणि प्रत्येक डीपीवर एबी स्विच बसविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास वीज वितरण अधिक सक्षम होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा सुद्धा नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती वासुदेव लोखंडे यांनी व्यक्त केली आहे.
