तालुकास्तरीय कृती दल समितीची मासिक बैठक संपन्न.
ग्रामपंचायतींच्या बेसलाईन स्कोअरचा आढावा; जनसहभाग वाढविण्यावर भर.
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
पंचायत समिती,नांदगाव खंडेश्वर येथे बुधवार (दि. ८ जुलै) रोजी ‘तालुकास्तरीय माझे गाव आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीची मासिक सभा उत्साहात पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतींच्या बेसलाईन असेसमेंट स्कोअरचा आढावा घेण्यात आला तसेच अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार होत्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखेडे, विस्तार अधिकारी (पंचायत) पांडे, EOH आरोग्य श्रीमती कमल धुर्वे, पत्रकार प्रतिनिधी उत्तम ब्राम्हणवाडे, प्राथमिक आरोग्य केंद्र धामकचे डॉ. मनवर, पापडचे डॉ. सोनुने, लोणी टाकळीचे डॉ. सरदार, मंगरुळ चव्हाळाचे डॉ. देऊळकर, सातरगावचे डॉ. मांडवघरे, तालुका आरोग्य सहाय्यक मेश्राम, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. बोरकर, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी डॉ. देशमुख, यांचेसह सर्व सदस्य उपस्थित होते. याशिवाय सर्व ग्रामपंचायत अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बेसलाईन असेसमेंट स्कोअरचा सखोल आढावा घेण्यात आला.आणि अभियानांतर्गत विविध निकषांवर करण्यात येणाऱ्या कामांची सद्यस्थिती तपासण्यात आली तसेच उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांनी सांगितले की, ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव‘ अभियानाच्या यशासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम व आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे.

तसेच अभियानांतर्गत मिळणाऱ्या पारितोषिकासाठी ग्रामपंचायतींनी आपला स्कोअर वाढविण्यावर भर द्यावा, आणि सर्व आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवाव्यात आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.तसेच दरमहा नियमित मासिक बैठका घेऊन आरोग्य विषयक उपक्रमांचा आढावा घेण्याबरोबरच लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व विविध विभागांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.या अभियानातून गावपातळीवर स्वच्छता,आरोग्य, पोषण आणि जनजागृतीची प्रभावी चळवळ उभी राहून आरोग्यदायी गाव घडविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल,असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी तथा समिती सचिव डॉ.प्राजक्ता वानखेडे यांनी व्यक्त केला.
