२० ते २७ नोव्हेंबरदरम्यान श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन
विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी; राज्यभरातील नामवंत कीर्तनकार,प्रवचनकारांची उपस्थिती
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
तालुक्यातील सातरगाव येथील श्री शिव ज्ञानपीठ आश्रमात प.पू. वेदांताचार्य गुरुवर्य मधुकर महाराज शास्त्रीजी यांच्या २० व्या समाधी सप्ताह सोहळ्यानिमित्त भव्य श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या सप्ताहाचे प्रवक्ते म्हणून मुंबई येथील श्री १०८ स्वामी दिव्येश्वरानंदजी महाराज उपस्थित राहणार असून, त्यांच्या श्रीमुखातून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे.
या सप्ताहादरम्यान दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ४ ते ५ महिला भजन, ५ ते ६ काकडा आरती, ७ ते ८ गीता पाठ, ९ ते ११ श्रीमद् भागवत कथा, दुपारी ३ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत. यामुळे संपूर्ण सातरगाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे.सप्ताहातील कीर्तन कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणांहून नामवंत कीर्तनकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी भाऊसाहेब महाराज शिंदे (वर्धा), शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी श्री १०८ स्वामी दिव्यानंदगिरी महाराज (त्र्यंबकेश्वर), रविवार, २२ नोव्हेंबर रोजी कैलास महाराज वाढे (जळगाव), सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी साहिल महाराज कासार (जळगाव) आणि मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी युवराज महाराज देशमुख (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे.तसेच गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी श्री १०८ स्वामी गणेशानंद गिरी महाराज (सातरगाव) यांच्या काल्याच्या कीर्तनाची विशेष पर्वणी भाविकांना लाभणार आहे. सप्ताहात विविध भजनी मंडळांचे भजन, मृदंग वादन तसेच हार्मोनियम वादनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी समाधी सप्ताहाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. या दिवशी सकाळी समाधीचा अभिषेक, त्यानंतर मिरवणूक आणि सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर श्रीक्षेत्र सातरगाव येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या धार्मिक सोहळ्यास विविध मठांचे महंत, महाराज मंडळी, संत-महात्मे आणि भाविकांची उपस्थिती राहणार आहे. श्री १००८ आचार्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी महाराज, अन्नपूर्णा पीठाधीश्वर, इंदूर यांच्यासह विविध संत-महंतांची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.सदर समाधी सप्ताहाचे आयोजन ट्रस्ट मंडळी व गावकरी मंडळी सातरगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, या धार्मिक सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
