शेकडो वर्षाची परंपरा अद्यापही आहे कायम*
थोरा मोठ्यासह लहानाचाही सहभाग
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
गुलाबी थंडीची पहाट. सूर्य उगवायला अजून अवकाश असतो. सगळा गाव झोपेत असतानाच दूरवरून टाळांचा खणखणीत नाद कानी येतो, मृदंगाच्या तालावर एक धीरगंभीर सूर उमटतो आणि अंधारालाही भक्तीचे तेज चढते.
कोजागिरी पौर्णिमेपासून अशा भक्तिमय जयघोषाने आसमंत दुमदुमून जातो. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावखेड्यात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात टाळ-मृदंगाच्या गजरासोबत हरिभक्तीची चैतन्यमय लहर सर्वत्र पसरली असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात कार्तिक स्नानानंतर काकडा आरतीने भक्तीचा जागर करण्याची वारकरी परंपरा आहे. काकडा आरतीतील प्रत्येक अभंग जणू लेकराला मायेने उठवणाऱ्या आईच्या हाकेसारखा भासतो.कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमा, असे महिनाभर रोज पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरात काकडआरती केली जाते. गावोगावचे भाविक ब्राह्ममुहूर्तावर स्नान करून मंदिरात एकत्र येतात. घंटानाद, टाळ, नगारा आणि शंखनादाने देवाला जागे करतात. तुळशीची वाळलेली काडी घेऊन तिला कोऱ्या कापडाची चिंधी गुंडाळतात आणि तेलातुपात भिजवून काकडा तयार करतात. त्याने देवाची आरती होते. वात जळल्यावर तिची काजळी कांस्याच्या पात्रावर काढून तिची भुकटी केली जाते, तिलाच बुक्का म्हणतात. वारकरी आणि भाविक तो कपाळी धारण करतात.स्कंदपुराणात हा मास सर्व तीर्थांपेक्षा पवित्र सांगितला आहे.

पहाटेचे हे वातावरण शब्दांत सांगणे कठीण आहे. महिला भल्या पहाटे उठून दारात सडा-रांगोळी करतात, आरतीचे ताट सजवतात, तुळशी वृंदावनापुढे दिवा लावतात. काही जणी दारात चौरंगावर देवदेवतांची प्रतिमा ठेवून समई लावतात आणि दिंडीची वाट पाहतात. समईच्या मंद ज्योती आणि रांगोळीचे रंग यांनी अंगण उजळून निघते. झोपेतून उठलेली लहान मुलेही डोळे चोळत ओसरीवर येऊन दिंडीकडे कुतूहलाने पाहू लागतात.अभंग म्हणत भाविक झेंडे घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात गल्लीगल्लीतून दिंडी काढतात. दारात दिंडी पोहोचली की प्रतिमेची पूजा होते, एक अभंग म्हटला जातो आणि दिंडी पुढे सरकते. वाटेतील प्रत्येक मंदिरात मूर्तीला स्नान घालून पूजा केली जाते. नियोजित मार्ग पूर्ण झाल्यावर पुन्हा मंदिरात येऊन ज्ञानोबा माउली तुकारामच्या गजरात आरतीची सांगता होते. त्यानंतर भजने, स्तोत्रे आणि कृष्णलीलांची गीते गायली जातात. कृष्णाच्या बाललीला आणि गवळणीच्या ओव्या ऐकताना सगळ्यांचे भान हरपते. लहानथोर, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब हा भेद विसरून सारा गाव एका सुरात गाऊ लागतो, हेच या परंपरेचे खरे सामर्थ्य आहे.आज ही काकड आरती मोजक्याच ठिकाणी दिसत असली, तरी वारकरी संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत रुजवण्याचे काम त्यातून होत आहे. मोबाईलच्या गजराने सुरू होणाऱ्या आजच्या दिवसाला टाळ-मृदंगाचा हा गजर एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. थंड पहाटेची शुद्ध हवा, सामूहिक गायनाचा आनंद आणि मनाला मिळणारी शांतता, या तिन्हींचा लाभ या परंपरेतून एकत्र मिळतो.काकडा म्हणजे केवळ आरती नव्हे, तर मनातील अंधार दूर करणारा तेजोमय जागर आहे. संतांनी घालून दिलेली ही शिस्त आजही माणसाला स्थैर्य देते. चला, या कार्तिक महिन्यात पहाटे उठून काकडा आरतीत सहभागी होऊ या आणि चंद्राच्या अमृतकिरणांचा वर्षाव झेलत पुण्यसंचय करू या.
