अनेक दिवसांपासून पुलाची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष.
सायंकाळच्या अंधारात वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता; तातडीने दुरुस्तीची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सावनेर आणि मोखड मार्गावरील पुलाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली असून, हा पूल खचल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली असून, विशेषतः सायंकाळच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. संबंधित विभागाने अद्याप या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
अमरावतीहून या मार्गाने नियमित ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांना दररोज या पुलावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पुलाची खचलेली अवस्था वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण करीत आहे. दिवसा पुलाची स्थिती काही प्रमाणात लक्षात येत असली, तरी सायंकाळच्या वेळी अंधारामुळे पुलावरील धोकादायक भागाचा अंदाज येणे कठीण होते.अशा परिस्थितीत दुचाकीस्वार,चारचाकी वाहनचालक तसेच इतर प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पुलाच्या दुरवस्थेचे छायाचित्र समोर आणत लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधी, आमदार,खासदार तसेच त्यांच्या संपर्कातील पदाधिकाऱ्यांपर्यंत या पुलाची छायाचित्रे पोहोचवून तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.पुलाची डागडुजी किंवा आवश्यकतेनुसार कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यापूर्वी संभाव्य अपघात टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी तातडीने सूचना फलक, बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी दिसतील अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येण्यापेक्षा वेळीच उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे.संबंधित बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे,अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सावनेर आणि मोखड या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
