अंजनगाव बारी (पवन इंगोले)
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील वडगाव (जिरे) येथील रायधोळ नदीला पूर आला असून, वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल तसेच स्मशानभूमीकडे जाणारा शेतकऱ्यांचा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पादचारी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत असून विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्यावरही परिणाम झाला आहे.

तसेच स्मशानभूमीकडे जाणारा हा एकमेव मार्ग बंद झाल्याने अंत्यविधीसारख्या अत्यावश्यक कामांमध्येही अडथळे निर्माण होत आहेत. यापूर्वी पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र यंदाच्या पुरात तो पुन्हा वाहून गेल्याने कायमस्वरूपी मजबूत पुलाची गरज अधोरेखित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पूल व रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच भविष्यात कायमस्वरूपी मजबूत पुलाचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी सरपंच धनश्याम ब्राह्मणे यांनी केली आहे.
