पावसाच्या पाण्याने शेतजमीनी निघाल्या खरडून
दुबार पेरणीचे संकट; महसूल व कृषी विभागाकडून पंचनाम्याची मागणी
अंजनगाव बारी (पवन इंगोले)
३० जूलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील एकूण २२ गावातील २५० हेक्टर मधील विविध पिकांचे नुकसान झाले असून जमिनीवरील माती पिकासगट पावसामुळे खरडून निघाली.
परिसरातील पार्डी (देवी), उदखेड, अऱ्हाड- कुऱ्हाड, वडगाव जिरे, भानखेड , मोगरा , कस्तूरा, भानखेड खुर्द, हातला,इंदला, मासोद, वळद, टिमटाळा, खिरसाना-निरसाना, निभोंरा इ. ठिकाणी मुसळधार पावसामुळे जमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे एकूण जमिनीचा आराखडा लक्षात घेता २५० हेक्टर जमिन जणू पडीत पडली आहे.
यंदा परिसरातील पेरणी प्रकीया उशीर झाल्याने बरिच पिके अघ्याप जमिनीतच होती.
तर काही पिके थोड्या प्रमाणात वर आलेली, तर काही रोपट्याच्या स्वरूपात उभी होती. पिकांनी आपली मुळेही अद्याप जमिनीत पक्की केलेली नव्हती यातच आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमीन मातीसकट खरडून निघाल्याने जमिनीतील बियाण्यापासून ते रोपट्यापर्यंत सर्वच पिके वाहून गेली. यामुळे २५० हेक्टर जमीन ओसाड पडली आहे. हे शेतकऱ्यांचे भारी नुकसान असुन यासाठी बळीराजाने स्वतः जवळील सर्व पैसा पेरणी, फवारा, निंदन इ.कामात खर्च केला व पिक वाढीच्या आशेवर स्तब्ध झाला. एकाएकीच आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांला आर्थिक दृष्ट्या कमजोर केल्याने ओसाड पडलेल्या जमिनीची दुबार पेरणी करण्यासाठी पैसा कुठून आणावा हा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा ‘पिक विमा’ काढला नसल्याने कोणत्याच प्रकारच्या नुकसान भरपाईची हमी शासन देणार नाही हे मात्र निश्चित यामुळे आता महसूल व कृषी विभाग हीच एक आशेची किरण शेतकऱ्यांकडे बाकी आहे.

शेतजमिनीला तलावाचे स्वरूप
शेत शिवारातील नाले तुडुंब भरून त्यातील पाणी संपुर्ण शेतात शिरल्याने शेतजमिनी तलावाचे स्वरूप आले आहे तसेच बागायती शेतीही पाण्याने तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांच्या फळभाज्या, सोयाबीन, कपाशी इ. नगदी पिकांचे नुकसान झाले आहे.
गावातील संपूर्ण पावसाचे पाणी येथील शेतकरी महादेव चकुले आशिष दानखडे व अनु कदम यांच्या शिरल्याने पिकांचेतर नुकसान झालेच याऊलट संपूर्ण शेतजमीन जलमय झाली आहे.
महसूल विभागाने याकडे जातीने लक्ष देत शेतजमीनींची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे शेतकरी वर्गामध्ये बोलल्या जात आहे.
