प्रशासनावर नगरसेविका छकुली गेडाम यांचा निशाणा
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जनता दरबारामध्ये ३ दिवसाआड नियमित पाणीपुरवठ्याचे दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका सौ. छकुली राहुल गेडाम यांनी या गंभीर प्रश्नावर थेट प्रशासनावर निशाणा साधला असून, “जनतेला आश्वासन देऊन विसरणे ही सवय झाली आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे.सदर परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून नगरसेविका छकुली गेडाम स्वतः पुढाकार घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. मात्र, हा तात्पुरता उपाय असून, प्रशासनाची जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.तसेच टेकडी भागात हँडपंप बसवण्याचा प्रस्ताव मांडण्यात येत असला तरी, त्या ठिकाणी पाण्याचा स्रोत उपलब्ध होण्याबाबत कोणताही ठोस तांत्रिक अहवाल समोर आलेला नाही. “हा उपाय वास्तवावर आधारित आहे की फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी?” असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
नगरसेविका छकुली गेडाम यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
• प्रभाग क्र. ३ मध्ये तात्काळ ३ दिवसाआड नियमित पाणीपुरवठा सुरू करावा
• नागरिकांना तोपर्यंत मोफत व नियमित टँकरद्वारे पाणी द्यावे
• कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी ठोस योजना जाहीर करावी
• हँडपंप प्रस्तावाबाबत तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा
“प्रभाग क्र. ३ मधील जनतेला केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष काम हवे आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा नगरसेविका छकुली राहुल गेडाम यांनी दिला आहे.
