विद्यार्थ्यांना मिळाले खेळण्यासाठी मोकळे मैदान
विविध वृत्तपत्रांच्या बातमीचा दणका; प्रशासन खडबडून जागे.
गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांच्या निर्देशानंतर जळूतील शाळा व स्मशानभूमीची तातडीने झाली स्वच्छता.
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
तालुक्यातील जळू येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आणि गवत वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शाळेच्या परिसरात साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच शाळेतील मैदानावरही मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पुरेशी मोकळी जागा उपलब्ध नव्हती.
या गंभीर समस्येकडे जळू येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल अशोकराव भाकरे यांनी लक्ष वेधले. त्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची तातडीने स्वच्छता करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत संबंधित विषय प्रसारमाध्यमांमधून ठळकपणे मांडण्यात आला.विविध वृत्तपत्रांच्या बातमीचा दणका बसताच प्रशासनाची तातडीने हालचाल सुरू झाली. बातमी प्रकाशित होताच नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने साफसफाई करण्याचे निर्देश दिले.

गटविकास अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जळू गावातील ग्रामसेविका चौधरी मॅडम तसेच नव्याने रुजू झालेले प्रशासक गलफट साहेब यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. त्याचबरोबर गावातील स्मशानभूमीचीही पाहणी करण्यात आली. शाळा आणि स्मशानभूमी परिसरातील वाढलेले गवत, झाडेझुडपे व इतर अनावश्यक वनस्पती हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला.विशेष म्हणजे, प्रशासनाने या विषयाची तातडीने दखल घेत एकाच दिवसात शाळा आणि स्मशानभूमी परिसराची साफसफाई पूर्ण केली. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला आहे.शाळेच्या परिसराची स्वच्छता झाल्याने आता विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. तसेच शाळेच्या परिसरातील साप व इतर प्राण्यांचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होणार असल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, जळू येथील ग्रामस्थांनी या समस्येला वाचा फोडून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल विविध वृत्तपत्रांचे आभार मानले. तसेच समस्येची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला साफसफाईचे निर्देश दिल्याबद्दल नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांचेही ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.प्रशासनाने यापुढेही शाळा परिसराची नियमित स्वच्छता राखावी, झाडाझुडपे पुन्हा वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ शैक्षणिक वातावरण मिळावे, अशी अपेक्षा जळू ग्रामस्थ व पालकांनी व्यक्त केली आहे.
