सिमेंटकरण,वाढती लोकसंख्या आणि भूजल संकटाचा इशारा
रेन वॉटर हार्वेस्टिंग व वृक्षलागवडीशिवाय शाश्वत विकास अशक्य
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून वाढत्या लोकसंख्येमुळे विकासकामांना गती मिळाली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार होत आहे.तसेच नवीन निवासी इमारती आणि शासकीय कार्यालयांच्या उंच इमारती उभारल्या जात आहेत. मात्र या विकास प्रक्रियेत पर्यावरणीय संतुलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.सिमेंट रस्त्यांमुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यासाठी जागा उरत नाही.परिणामी भूजल पातळी खालावत असून पावसाचे पाणी थेट नाल्यांमधून वाहून जात आहे. शहरातील नव्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनत आहे.

यामुळे शहरातील तापमानात वाढ होत असून उष्णतेची तीव्रता नागरिकांना जाणवू लागली आहे.नगर पंचायतीकडून शहरात वृक्षलागवडीच्या बाबतीत कोणताही ठोस उपक्रम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगर पंचायतीने नागरिकांना आपापल्या घरासमोर झाडे लावण्यास परावृत्त केले पाहिजे याकरिता त्यांना काही बक्षीस योजना किंवा करामध्ये सूट देण्यासाठी उपाय योजना आखल्या गेली पाहिजे तरच यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढेल. त्याच प्रमाणे शहरातील अमरावती यवतमाळ, चांदूर रेल्वे,पहूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दोन्ही कडेला सावली देणारी झाडे नसल्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. तसेच पक्षी व प्राण्यांसाठीही निवारा व अन्नाची कमतरता निर्माण होत आहे.
परिस्थिती सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय तातडीने राबवणे गरजेचे आहे.निंबाची,वडाची,आणि पिंपळाची झाडे लावणे गरजेचे आहे.नवीन घर किंवा शासकीय कार्यालयांच्या बांधकामाला परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करणे.१०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र घेऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची जबाबदारी निश्चित करणे.सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात पाणी झिरपण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापरकरणे.सार्वजनिक बोरवेलमधील वाया जाणारे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी योग्य व्यवस्थाकरणे.याशिवायअमरावती-यवतमाळ महामार्ग, चांदूर रेल्वे रोड आणि पहूर रोड या मुख्य मार्गांच्या दोन्ही बाजूंनी निंब, वड, पिंपळ यांसारखी सावली देणारी व पर्यावरणपूरक झाडे लावणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल,प्रवाशांना सावली मिळेल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.

तसेच शहरातील सर्व गाव तलावांचे खोलीकरण करणे ही काळाची गरज आहे. यामुळे पाणीसाठा वाढून भूजल पुनर्भरणाला मदत होईल. या सर्व उपाययोजनांसाठी नगर पंचायत, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.शहराचा विकास करताना पर्यावरणीय संतुलन राखणे आणि शहरात जिथे जिथे मोकळी जागा आहे लेआऊट मधील ओपन स्पेस आहे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली गेली पाहिजे तरच खरी शाश्वत प्रगती ठरेल.अन्यथा येणाऱ्या काळात नांदगाव खंडेश्वरमधील नागरिकांचे जीवन जगणे अधिक कठीण होणार हे निश्चित आहे. नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर आपल्या कार्यालयात न बसता शहराचा फटका मारून नागरिकांचे याबाबत बुद्ध बुद्ध करणे आवश्यक आहे.
