नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
श्री. सचिनजी अहिर, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती, तसेच शिवसेना उपनेत्या प्रीती ताई बंड नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा गावात आले असता शिवसैनिक मोरेश्वरराव परळीकर, कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव संतोष सुरजूसे, बाळासाहेब राणे, वासुदेव चौधरी, हनुमान शिंदे, पंकज पिंपळकर, शंकर गुल्हाने, शेतकरी व गावकरी यांनी गाड्यांचा ताफा अडवून शेतातील पिक दाखविले व शेतातील दाहकता व प्रचंड नुकसानीची प्रत्यक्ष अनुभूती करून दिली.

यावेळी मंगरूळ चव्हाळा येथे ३१ जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे घरांची पडझड झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या नावांचा यादीतून वगळण्यात आल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यादीतून नावे वगळण्यात आलेल्या पात्र पूरग्रस्तांना त्यांच्या घरांच्या नुकसानीचा शासकीय मोबदला तातडीने मिळावा व दुकानदारांना सुद्धा मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच महापुरामुळे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांनाही अद्याप मोबदला मिळालेला नसल्याने, त्यांनाही योग्य नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शेकडो गावकरी व नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते. पूरग्रस्तांच्या या प्रश्नांची शासन दरबारी दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
